ठाणे: अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या वकीलामार्फतीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. देशमुख हे फरार होण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असे तिने या याचिकेमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केतकी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोमवारी करण्यात आली आहे.
केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी हस्तक्षेप याचिकेमध्ये म्हटले आहे की, राज्यसभेसाठी मतदान करता यावे, म्हणून एका दिवसाचा जामीन अनिल देशमुख यांनी मागितला आहे. जर देशमुख फरार झाले तर महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि इडी यांच्याशी त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासंबंधी कसलेही सहकार्य करणार नाहीत. ‘अनिल देशमुख मिळून येत नाहीत’ असा अहवाल सादर केला जाऊ शकतो. महाराष्ट्र पोलिसांनी असे केल्यास सीबीआय किंवा ईडी यांच्या ताब्यात देशमुख कधीही येणार नाहीत. त्यामुळेच देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती करणारा अर्ज देशपांडे आणि घनश्याम उपाध्याय या वकीलांनी विशेष न्यायालयात सादर केला आहे.
मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा का नाही?वकील देशपांडे यांनी केतकीच्या वतीने राज्यपाल डॉ. भगतसिंग कोश्यारी यांनाही एक पत्र दिले आहे. फेसबुकवरील एका पोस्टवरुन राज्यभरातील २२ पोलीस ठाण्यांमध्ये केतकीविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या सर्व प्रकरणातील तक्रारदार एका बलाढ्य राजकारण्याचे समर्थक आहेत. सर्व तक्रारीतील मजकूर बराच सारखा आणि एकाच व्यक्तीने लिहून दिल्यासारखा वाटतो. त्यामुळे तिला १४ मे २०२२ रोजी कळंबोली पोलिसांनी बोलावून घेतले. कळवा पोलिसांनी तेथे त्यांना ताब्यात घेतले. कळव्याला जाण्यासाठी पोलीस वाहनाकडे नेले जात असतांना केतकीवर हल्ला झाला. आदिती नलावडे आणि अन्य लोकांनी घोषणाबाजी केली. केतकी यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग तसेच पोलिसांवर शाईफेक, अंडीफेकदेखील केली. याप्रकरणी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला जात नसल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आदिती नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद होता कामा नये यासाठी पोलिसांवर दबाव असून यामागे एका बलाढ्य राजकारण्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गुन्हा नोंदविण्यासाठी पोस्टाने कळंबोली स्थानकाला तक्रार पाठवा असे न्यायालयाने सांगितल्याने सर्व पुराव्यासह अशी तक्रार दाखल केली आहे. तरीही ती दाखल न झाल्याने देशपांडे यांनी खेद व्यक्त केला आहे.
एट्रॉसिटीच्या जामीन अर्जाची मंगळवारी सुनावणीदरम्यान, केतकीविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एट्रॉसिटीच्या गुन्हयासंदर्भात जामीन अर्जाची मंगळवारी तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जामीन अजार्ची १० जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.