मुंबई : २०१५ साली आयपीएल सामन्यां दरम्यान झालेल्या २,६०० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी प्रकरणात उजेडात आलेला कथित बुकी अनिल जयसिंघानी याची ३ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यापूर्वी ६ जून रोजी जयसिंघानी याचे शिर्डी येथील हॉटेलदेखील ईडीने जप्त केले होते.
शिर्डी येथील हॉटेलचा भूखंड जयसिंघानी याने २ कोटी रुपयांना विकत घेतला होता आणि तो व्यवहार सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांतून केल्याचा ठपका ईडीने ठेवला असून, सट्टेबाजीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून हे हॉटेल जप्त करण्यात आले आहे. मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
जयसिंघानीची मालमत्ता १०० कोटींची असल्याचे ईडीच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. यामध्ये हॉटेल्स, फ्लॅटस, दुकाने, भूखंड आणि अन्य स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचे समजते. जयसिंघानीच्या कुटुंबीयांच्या, तसेच निकटवर्तीयांच्या बँक खात्यांतही बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.
आरोपपत्र दाखल२०१५ साली झालेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान झालेल्या बेटिंग प्रकरणात अनेक बुकी सक्रिय होते. त्यांच्याविरोधात त्यावेळी बडोदा येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याच तक्रारीच्या आधारे ईडीनेदेखील तपास सुरू केला होता. याप्रकरणी ईडीने अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी जससिंघानीला अनेक वेळा समन्स जारी करण्यात आले होते.