ओबुलावारीपल्ली - आपल्या मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती पत्नीसह कुवैतमध्ये राहणाऱ्या अंजनेय प्रसाद यांना कळालं. अंजनेय प्रसाद यांची मुलगी तिच्या मावशीकडे अन्नामय्या जिल्ह्यातील ओबुलावारिपल्लीमध्ये राहत होती. अंजनेय प्रसाद वेळोवेळी कुवैतमधून मुलीला खर्चासाठी पैसे पाठवत होते. मावशी मुलीची प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती परंतु वास्तव काही वेगळेच होते. अंजनेय प्रसाद आणि त्यांच्या पत्नीला एकेदिवशी संशय आला, आपल्या मुलीसोबत काही ठीक होत नसल्याचं त्यांना वाटत होते. त्यातच अंजनेय प्रसाद यांनी त्यांच्या पत्नीला भारतात पाठवले आणि ती जेव्हा ओबुलावारिपल्लीत आपल्या बहिणीकडे गेली तेव्हा हैराण झाली.
अंजनेय प्रसाद यांच्या मुलीवर त्यांच्या नातेवाईकाने लैंगिक शोषण केले होते. जेव्हा ही गोष्ट कुवैतमध्ये अंजनेय प्रसाद यांना कळली तेव्हा त्यांनी पत्नीला तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. मुलीला सोबत घेऊन आई पोलीस स्टेशनला गेली आणि गुन्हा दाखल केला परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. आपल्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत होते असं अंजनेय प्रसाद यांना वाटले तेव्हा आपणच आरोपीचा बदला घ्यायचा हे त्यांनी ठरवले आणि त्यांनी भारत गाठले.
भारतात येऊन अंजनेय प्रसाद यांनी आरोपीची हत्या केली. ६ डिसेंबरच्या रात्री त्यांनी आरोपीची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली आणि त्यानंतर कुवैतला निघून गेले. अंजनेय प्रसाद यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून बदला घेतल्याचा खुलासा केला. त्यांच्या मुलीचे वय १२ वर्ष असून ती अनेक वर्षापासून भारतात तिच्या मावशीसोबत राहत होती. हा आरोपी ५९ वर्षीय होता. तो दूरचा नातेवाईक होता. याबाबत पोलीस अधिकारी एन सुधाकर म्हणाले की, अंजेनय प्रसाद हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात आले होते. ६-७ डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांनी अंजनेयुलू या व्यक्तीची हत्या केली. हत्येनंतर ते कुवैतला गेले तिथून व्हिडिओ बनवून बदला घेतल्याचं कबुल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.