अंकिता मर्डर केसमध्ये आज मोठमोठे खुलासे झाले आहेत. उत्तराखंडच्या भाजपाच्या नेत्याचे हे रिसॉर्ट असून त्याचा मुलगाच या मर्डरमागील मुख्य आरोपी आहे. त्याला आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी जनतेचा दबाव आल्यावर अटक केली असून त्यांच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.
या रिसॉर्टमध्ये अशीच एक तरुणी यापूर्वी बेपत्ता झाली होती. या रिसॉर्टमध्ये गैरधंदे सुरु असायचे. काही महिन्यांपूर्वीच रिसेप्शनिस्ट म्हणून लागलेल्या अंकितावर देखील असाच एक प्रसंग ओढवला होता. यामुळे तिची नाल्यात ढकलून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गुरुवार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत अंकिताचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. माजी राज्यमंत्र्याचा मुलगा पुलकित आर्यने तिला धक्का देऊन वाहत्या नाल्यात अंकिताला ढकलले होते. यानंतर ते पसार झाले होते. ती जिवंत असल्याचे ते कर्मचाऱ्यांना भासवत होते. पोलिसांच्या चौकशीत अंकिता १८ ऑक्टोबरला पुलकित आर्य, मॅनेजर अंकित आणि भास्कर यांच्यासोबत रिसॉर्टमधून बाहेर गेल्याचे समोर आले. रात्रीचे आठवाजले होते. यानंतर साडे दहा वाजता हे तिघे रिसॉर्टला आले, परंतू अंकिता नव्हती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची चौकशी केली, तेव्हा त्यांनी घटनाक्रम सांगितला. अंकिताला त्यांनी रिसॉर्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत शरीर संबंध म्हणजेच वेश्याव्यवसाय करण्यास वारंवार सांगितले होते. परंतू तिने नकार दिला होता. तसेच ही गोष्ट ती सर्वांना सांगत होती, यामुळे तिला संपविल्याचे या आरोपींनी सांगितले. ती यानंतर रिसॉर्टमधील काळ्या धंद्यांची माहिती लोकांना देईल अशी धमकी देत होती. यावरून वाद सुरु होता. घटनेच्या दिवशी माजी मंत्र्याचा मुलगा आणि त्याचे दोन मॅनेजर मित्र दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून अंकितासोबत निघाले. त्यांनी फास्टफूड आणि दारु पिली. यानंतर नाल्याजवळ गेले. इथे अंकिता आणि पुलकितमध्ये भांडण सुरु झाले. यामुळे रागातून अंकिताने पुलकितचा मोबाईल हिसकावला व नाल्यात फेकून दिला.
याचा पुलकितला राग आला, त्याने तिला नाल्यात ढकलून दिले. अंकिताने दोनदा पाण्यातून वर येत मदतीसाठी हाका मारल्या, परंतू तिघे घाबरून पळाले.