नवी दिल्ली - वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईकच्या मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या पाच मालमत्ता जप्तीचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील कोर्टाने ऑक्टोबर महिन्यात दिले होते. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झाकीर नाईकच्या मुंबईसह पुण्यातील १६.४० कोटींची मालमत्ता पीएमएलए कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. प्रक्षोभक भाषणे करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अंमलबजावणी संचालनालया (ईडी)नं संयुक्तरीत्या कारवाई करण्याची झाकीर नाईकला भीती होती. त्यामुळेच तो परदेशात परागंदा झालाय. अखेर मलेशिया सरकारनं झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.