पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये निनावी पत्रांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रकरण दुर्गापूर पोलीस आयुक्तालय कार्यालयाजवळील इव्हनिंग लॉज परिसरातील आहे. येथील २४ हून अधिक अधिकाऱ्यांच्या घरातून निनावी धमकीची पत्रे सापडली आहेत. या पत्रांमध्ये कोणा अधिकाऱ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून काहींकडून दागिन्यांची मागणी करण्यात आली आहे."पैसे आणि दागिने घराबाहेरील लेटर बॉक्समध्ये ठेवा. असे न केल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा,” असे त्या पत्रात म्हटले आहे.
शहरातील इव्हिनिंग लॉज परिसरात १०० हून अधिक अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. यासोबतच एडीजीपी सेंट्रल, एडीजीपी मुख्यालय, एफआरओ कार्यालय, आयबी मध्यवर्ती कार्यालयासह दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाचे कार्यालय जवळच आहे. येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर कडेकोट पोलीस बंदोबस्तात आहे. असे असले तरी अशा प्रकारे निनावी पत्रे मिळाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, या परिसरात राहत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी याची पोलिसांत तक्रार केली आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी तपासासही सुरूवात केली आहे. अधिकाऱ्या पत्र पाठवणारी व्यक्ती ही शिक्षितच आहे, म्हणून ती इंग्रजीमध्ये पत्र लिहून टाकत आहे. सध्या पोलीस आरोपीला पकडण्याचा प्लॅन आखात आहे. तो कितीही हुशार असला तरी त्याला लवकरच पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.