ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकासह डी विभागाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लिपिकाकडून पाच दिवसांपूर्वीच मद्यासह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्या चौकशीतून आणखी ११ लाख ७८ हजारांच्या बनावट विदेशी मद्यासह २३ लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे आणि डी विभागाचे निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांनी २४ सप्टेंबर रोजी बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी अटक केलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा लिपिक वासुदेव चौधरी ऊर्फ वासू याच्याकडून २८ सप्टेंबर रोजी त्याच्याच मोबाइलमधील माहितीच्या आधारे पुन्हा धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये त्याच्याकडून रायगड जिल्ह्यातील पनवेल, तळोजा एमआयडीसी भागातून एका टेम्पोसह विदेशी बनावटीची; परंतु केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली ३६ बल्क लिटर बियर, एक हजार ३४९.२८ बल्क लिटर मद्य असे ११ लाख ७८ हजार १८० रुपयांच्या मद्यासह २३ लाख तीन हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वासुदेव याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून त्याच्याकडून आणखीही मद्याचा साठा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्याकडून याआधी २४ सप्टेंबर रोजी अंबरनाथ येथील कुंभार्ली गावातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७२५ बल्क लिटर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह ४९ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून ७२ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक शिरसाठ यांनी दिली.