मुंबई क्राईम ब्रँचने रविवारी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात महाराष्ट्रातील अकोला येथून एकाला अटक केली आहे. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या २५ झाली आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील पेटलाद येथील रहिवासी सलमानभाई इक्बालभाई वोहरा याला महानगरापासून ५६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोल्यातील बाळापूर येथून अटक करण्यात आली.
१२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर भागात झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. वोहराने यावर्षी मे महिन्यात एक बँक खातं सुरू केलं होतं आणि अटक करण्यात आलेले आरोपी गुरमेल सिंह, रुपेश मोहोळ आणि हरिशकुमारचा भाऊ नरेशकुमार सिंह यांना आर्थिक मदत केली होती. त्याने गुन्ह्याशी संबंधित इतर लोकांनाही मदत केली होती असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
हत्येनंतर घटनास्थळावरून हरियाणाच्या गुरमेल सिंह आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील बहराइच येथून मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार १२ ऑक्टोबरपासून फरार होता आणि नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याल पकडण्यात आलं.
सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यापासून लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर दहा दिवसांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कट रचायला सुरुवात झाली होती.