लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यासह एनआयएच्या अटकेत असलेला बडतर्फ एपीआय सचिन वाझे व अन्य इतर चार जणांवर ९ लाखांच्या रोख रकमेसह एकूण ११ लाख ९२ हजारांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेस्टॉरंट व बारवर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी त्यांनी रोख रकमेसह दोन महागडे मोबाइल वसूल केल्याची तक्रार बिमल मोतीलाल अग्रवाल या ठेकेदाराने दिली.
जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ही खंडणी वसूल केल्याचे अग्रवालने म्हटले आहे. बिमल अग्रवाल हा विविध वस्तू उत्पादन करण्याचे तसेच सरकारी, मुंबई महापालिकेला विविध वस्तू पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये वाझेने त्याला भेटून परमबीर सिंह हे मुंबईला आयुक्त म्हणून येणार आहेत, मला पुन्हा जॉइन करून घेणार असून, कलेक्शनचे काम माझ्याकडे येणार आहे, तेव्हा हॉटेलचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने अनिकेत पाटीलबरोबर भागीदारीत गोरेगावमध्ये बोहो बार व रेस्टॉरंट आणि बॉम्बे कॉकटेल बार सुरू केला होता.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुडलक म्हणून २ लाख व त्यानंतर दर महिन्याला दीड लाख याप्रमाणे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत वेळोवेळी प्रत्येकी ४.५ लाख असे एकूण ९ लाख रुपये वाझेतर्फे कलेक्शन करणाऱ्या सुमीत सिंग याने घेत त्याचे साथीदार विनय सिंग, रियाज घाटी यांना फोन करून वाझेकडे वसुलीची रक्कम पोहोचवली. वाझेने अग्रवालकडून त्याच्यासाठी आणि केदारी पवार या पोलिसासाठी प्रत्येकी १.४२ लाख रुपये किमतीचे दोन मोबाइल घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. समाजसेवा शाखेतील माने व घाटगे या कर्मचाऱ्यांनी त्यातील काही रक्कम नेल्याचे नमूद केले आहे.
हप्तावसुलीसाठी माणसे नेमल्याचा दावाअग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीत परमबीर व वाझे यांनी मुंबईतील बारचालक, बीएमसी ठेकेदार व बुकीकडून दर महिन्याला हप्ता वसुलीसाठी माणसे नेमल्याचा दावाही केला आहे. या दोघांशिवाय सुमीत सिंग ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुमीत सिंगला अटक केली आहे.