पुणे : खोट्या कागदपत्राच्या आधारे शिवाजीनगर येथील जागा खरेदी करुन देतो, असे सांगून ७२ लाख ३० हजार रुपये घेऊन व्यवहार पूर्ण न करता फसवणूक केली व पैसे परत मागितल्यावर त्यांच्या कानाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले असून समर्थ पोलिसांनी बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस शिपाई परवेज शब्बीर जमादार (वय ३५, रा़ सोमवार पेठ पोलीस लाईन), जयेश जितेंद्र जगताप (वय ३०, रा़ घोरपडे पेठ), अमित विनायक करपे (वय ३३, रा़ रास्ता पेठ) यांना आज पहाटे ५ वाजता अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के (वय ३५, रा़ मायोला, रेसिडेन्सी, ऋतुजा पार्क) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१८ च्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना सेनापती बापट रोडवरील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, येथील बंगला व आऊट हाऊस ही मिळकत प्रकाश फाले यांच्या मालकीची असून त्यांचा जयेश जगताप यांच्या समवेत करारनामा झाला असल्याचे भासवून त्याची प्रत दाखवली़ या जागेबाबत प्रकाश फाले यांचा न्यायालयीन दाव्यावर युक्तीवाद झाला असून न्यायालयीन निकाल ३ महिन्यात निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, असा भरवसा शैलेश जगताप व इतरांनी दिला़ या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी फिर्यादीस प्रवृत्त केले.
या जागेवरील आरोपींचा हक्क सोडण्यासाठी २ कोटी आणि प्रकाश फाले जमीन मालक म्हणून त्यांना अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले़ त्यानुसार प्रकाश फाले यांना ४९ लाख ३० हजार रुपये दिले होते़ तसेच शैलेश जगताप यांच्या सांगण्यावरुन अमित करपे यांच्या बँक खात्यावर ११ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले़ शैलेश यांनी फोर्ड एन्डेव्हर गाडीची मागणी केली़ त्याचे मागणीनुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या समोरील जागेवरील कार्यालयात रोख स्वरुपात ११ लाख रुपये फिर्यादीने दिले़ तीन महिन्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये फिर्यादी यांनी शैलेश जगताप यांच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली़ तेथे रवींद्र बºहाटे, जयेश जगताप, शैलेश जगताप, परवेज जमादार हे बसलेले होते़ त्यावेळी व्यवहार आता लांबत चालला असून आपल्याला व्यवहार करायचा नाही, असे सांगितल्यावर शैलेश जगताप यांनी फिर्यादी यांच्या कानाखाली मारली़ इतरांनी मारहाण केली़ शैलेश जगताप यांनी रिव्हॉव्हर काढून कानशिलाला लावली व राहिलेले १ कोटी ८८ लाख रुपये द्यायचे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही़ मी गनमॅन म्हणून प्रसिद्ध आहे़ तुला माहित नाही का, आम्ही लोकांची वसुल करतो, तू आमच्याकडून वसुली करणार का? अशी धमकी ही दिली़ त्यानंतर परवेज जमादार याने फिर्यादीस फोनकरुन तुझ्या नावावर अॅक्सेस गाडी घेऊन मला पाठव असा दम दिला़ त्यावरुन फिर्यादीने त्यांचा मित्र कमलेश भाटी याच्या नावावर गाडी घेऊन ती परवेज जमादार यांना दिली.
सर्व आरोपींनी कट करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांचे समवेत आर्थिक व्यवहार ठरवून व्यवहार पूर्ण न करता, त्यांचे ७२ लाख ३० हजार परत न करता फसवणूक केली. यामुळेच केले होते बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस शिपाई परवेज जमादार यांना नीलमणी देसाई यांच्या तक्रारीवरुन पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते़ या चौकशीत पोलिसांनी ऋषीकेश बारटक्के या गुन्हेगाराशी संबंध ठेवले. त्याच्याकडून कपडे खरेदी केल. व इतर अनेक आरोप ठेवून त्यांना बडतर्फ केले होते. आता बारटक्के यांच्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.