ठळक मुद्देपोलिसांनी सईदविरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस जारी केली होती. सईदला मोक्का कोर्टात हजर केलं असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना बेड्या ठोकल्यानंतर टोळीतील इतर हस्तकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकांच्यापोलिसांनी गँगस्टर अनिस इब्राहिम याचा हस्तक मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला सोमवारी केरळमधील विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईतील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी अनिसकडून धमकवण्यात आलं होतं. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाकडून खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली. तपासात ही धमकी अनिसचा हस्तक रामदास रहाणे याने दिल्याचं उघड झालं. त्यानुसार गुन्हा दाखल करत खंडणीविरोधी पथकाने चार आरोपींना अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुबई येथे राहणारा मोहम्मद सईद हा अनिसचे व्यवहार सांभाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांच्या रडारवर सईद हा होता.पोलिसांनी सईदविरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान, सोमवारी सईद केरळ विमानतळावर उतरला. त्यावेळी ओळख परेडमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. सोमवारी सईदला केरळमधून खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सईदला मोक्का कोर्टात हजर केलं असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सईद हा नवी मुंबईत राहत होता.