निलंबित सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर आता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र, वाझे यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही वाझेंनी ३० लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ईडी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘बार्क’(BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह यांना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याची चर्चा होतं आहे. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे.
त्यातच भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा १५ मार्च २०२१ रोजीच केला होता’ असे नमूद करणारे ट्विट केले होते.