नागपूर : उपराजधानीतील हत्यांचे सत्र सुरूच असून आणखी एका तरुणाच्या हत्येची नोंद झाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील चार दिवसांतील ही चौथी हत्या असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा परत चर्चेला आला आहे.
फिरोज उर्फ पक्या उर्फ शेख सत्तार (२२, ऑरेंज नगर, वाठोडा) असे मृतकाचे नाव आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता व शहरातील दोन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद होती. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो घराबाहेर गेला. मात्र मध्यरात्रीनंतरदेखील तो परतला नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला. स्मित बारच्या मागील गल्लीत एका मोकळ्या प्लॉटमध्ये तो जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या डोके, जबडा, छाती, पोट व पाठीवर शस्त्राचे वार होते.
गंभीर जखमी असलेल्या फिरोजला मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील शेख सत्तार उर्फ शेख रहमतुल्ला (६२) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
वाठोडा पोलीस ठाण्यातील दुसरी हत्याया महिन्याच्या पाच दिवसांत शहरात चार हत्यांची नोंद झाली आहे. त्यातही दोन हत्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच झाल्या आहेत. २ फेब्रुवारी रोजी एक हत्या झाली होती. या पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक अनधिकृत कामे चालतात व जमीन बळकावणे तसेच पैशांच्या मुद्द्यावरून वादाच्या अनेक घटना घडतात. मात्र असे वाद पोलिसांकडून गंभीरतेने घेण्यात येत नाहीत व त्यातूनच गंभीर गुन्हे घडतात.