कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात सातत्याने नव-नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता एक नवीन नाव समोर आले आहे. यासंदर्भात, रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी मोठा दावा केला असून, आरजी कार रुग्णालयाशी कसलाही संबंध नसताना डॉ. देबासीश शोम क्राइम सीनवर उपस्थित होते, असे म्हटले आहे.
कोन आहेत डॉक्टर देबासीश शोम? -अख्तर अली यांनी दावा केला आहे की, रुग्णालयात 31 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर, क्राइम सीनवर डॉक्टर देबासीश शोमही उपस्थित होते. एवढेच नाही, तर ते पोस्टमॉर्टमच्या वेळीही उपस्थित होते. शोम हे पश्चिम बंगाल आरोग्य भरती बोर्डाचे सदस्य आहेत. सध्या आरजी कर रुग्णालयासोबत त्यांचा काहीही संबंध नाही.
महत्वाचे म्हणजे, शोम हे पूर्वी आरजी कर रुग्णालयाच्या फॉरेंसिक मेडिसिन विभागाचे HoD होते. त्यांच्याच काळात औषधांच्या खरेदी-विक्रीत घोटाळ्याचा आरोप झाला होता, असा दावाही अख्तर यांनी केला आहे.
8-9 ऑगस्टच्या रात्री काय घढल? -कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार झाला होता आणि तिची हत्या करण्यात आली होती. ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. मृतदेह आढळण्याच्या काही तास आधीच ती आपली 36 तासांची शिफ्ट करून आराम करण्यासाठी हॉलमध्ये गेली होती.
तिच्या शवविच्छेदनात 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजनुसार, संजय रॉय 9 ऑगस्टला पाहाटे 4.03 वाजता रुग्णालयात दाखल झाला होता. 8 ऑगस्टला तो चेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेला होता आणि कॅमेऱ्यात पीडित डॉक्टर आणि इतरांना टक लावून बघताना दिसून आला होता. कोलकाता पोलिसांनी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला संजय रॉयला अटक केली होती.