मडगाव - मडगावचा सराफ स्वप्नील वाळके याचा खुनी मुश्ताफा यांच्याकडून क्राईम ब्रँचने आणखी एक पिस्तुल जप्त केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुश्ताफाची आई शमशाद बेगम हिच्यासह एकूण सहा जणांवर बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या 2 सप्टेंबर रोजी स्वप्नीलचा मडगावात दिवसढवळ्या गोळी झाडून खून केला गाला होता. यासंदर्भातील पिस्तुल पोलिसांनी नंतर जप्त केले होते. खुन्याने हे पिस्तुल बिहारमधून आणले होते.
तपास अधिकारी निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने जप्त केलेले दुसरे पिस्तुलही संशयितांनी त्याचवेळी विकत घेतले होते. मुश्ताफाने हे दुसरे पिस्तुल शिरवडे नावेली येथे राहणारी त्याची आई शमशाद बेगम हिच्याकडे ठेवायला दिले होते. त्याच्या आईने घराच्या छपराच्या पत्र्या खाली ते लपवून ठेवले होते. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ते जप्त केले.
या प्रकरणात पोलिसांनी मुश्ताफा, त्याची आई शमशाद, मुश्ताफाचा साथीदार इव्हेंडर रोड्रिग्स तसेच यापूर्वी पिस्तूलविक्री प्रकरणात अटक केलेल्या तीन बिहारी संशयितांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुश्ताफाच्या आईला अजूनही अटक करण्यात आलेली नाही, असे पाटील यांनी सांगितले.