औरंगाबाद : सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना पळवून नेण्याचा कट सोमवारी (दि.२७) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना हर्सूल येथून ताब्यात घेतले. कटातील नऊ जण या पूर्वीच ताब्यात असून सध्या पोलीस कोठडीत आहेत.
माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना किंवा अगदी न्यायालयाच्या परिसरातून गोळीबार करून पळवून नेण्याचा कट रचण्यात आला होता. हा कट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गरवारे क्रीडा संकुल परिसरात उधळून लावला. यावेळी पोलिसांनी चार शार्प शूटरसह नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याशी कोठडीत चौकशी केली असता कटात विजय कुमार रामप्रसाद चौधरी व अबू चाऊस यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
काल रात्री दोघेही हर्सूल परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी कोलठाणवाडी रोडवर सापळा रचून विजय चौधरी आणि अबू चाऊस यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून एक गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त दिपाली धाटे - घाडगे व निकेश खाटमोडे पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने केली.