मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना अज्ञात गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देणारे कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी त्यांना ही धमकी देण्यात आली असून शिवीगाळही करण्यात आली आहे. याप्रकरणी उदित नारायण यांनी मुंबई पोलिसांच्याखंडणीविरोधी शाखेकडे आणि अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या गुन्ह्याचा आम्ही तपास देखील करत असल्याचं पुढे रस्तोगी यांनी सांगितलं.
गेल्या महिन्याभरापासून अज्ञात व्यक्तींकडून गायक उदित नारायण यांना आजवर तीन वेळा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. फोन करणारी व्यक्ती नेहमीच त्यांना रवी पुजारी असल्याचे सांगते आणि मोठी रक्कम देण्याची मागणी करण्यात येते. तसेच जर पैसे दिले नाहीत तर शिवीगाळ आणि जीव घेतला जाईल अशा धमक्याही दिल्या असल्याचं उदित नारायण यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत फोन करणाऱ्यांचे लोकेशन हे बिहार राज्यातील असल्याचे उघड झाले आहे. तसेच ज्या फोनवरुन हे धमकीचे फोन येत आहेत तो मोबाईल क्रमांक संबंधित सिमकार्डच्या कंपनीत एका वॉचमनचा नंबर म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सुरक्षा रक्षकही चौकशी केली, मात्र त्याने तीन महिन्यांपूर्वी आपला फोन चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. फोन चोरीला गेला त्यावेळी हा सुरक्षारक्षक बिहारला गेला होता.