मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवून ज्या इनोव्हातून त्या ड्रायव्हरने पळ काढला होता ती इनोव्हा मुंबई पोलिसांचीच असल्याचे समोर येत आहे. एनआयएने इनोव्हा गाडीचे कोडे सोडविल्याचा दावा केला आहे. (Innova belongs to Mumbai police crime Branch, headed towards Thane.)
अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या मुलुंड टोलनाक्यावर त्या इनोव्हामध्ये दोन व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. ही इनोव्हा कोणाची होती याचा तपास सुरु होता. यावर आता एनआयएच्या सुत्रांनी खळबळजनक माहिती उघड केली आहे.
ही इनोव्हा कार मुंबई क्राईम ब्रांचचीच होती. त्यामध्ये स्कॉर्पियो कारचा मालक मनसुख हिरेन होता. अँटिलिया केसध्ये मुंबई पोलिसांचा आणखी एक अधिकारी रियाज काझी याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप
सुत्रांनुसार या प्रकरणात दोन वाहने वापरली होती. स्कॉर्पिओ कारच्या मागे इनोव्हा कार जात होती. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर ही कार दिसली. चेंबूर भागात इनोव्हा आणि स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कार एकत्र आल्या. त्यानंतर दोन्ही कार या अँटिलियाच्या दिशेने कार्मायकल रोडवर गेल्या. स्कॉर्पिओ तिथेच सोडून ही इनोव्हा ठाण्याच्या दिशेने गेली. ठाण्यामध्ये प्रवेश करताना ही कार पाहिली गेली. यानंतर इनोव्हा कुठेच दिसली नव्हती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत या कारचा उल्लेख केला होता. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन दोघेही ठाण्यात राहतात. हिरेन यांची चोरी झालेली स्कॉर्पिओ कार वाझे यांच्याकडे कशी आली याची माहिती मिळविण्यासाठी वाझे राहत असलेल्या सोसायटीचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आजतकने याची बातमी दिली आहे.
अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.