Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:23 PM2021-10-26T21:23:34+5:302021-10-26T21:25:14+5:30
Antilia bomb scare : राज्य सरकारला वाझेचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई : अंटालिया बॉम्बस्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तळोजा कारागृहातून नजरकैदेत ठेवण्यासंदर्भात केलेल्या अर्जाला एनआयएने विरोध केला. वाझे याची जामिनावर सुटका केली तर तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि फरार होऊ शकतो, असे एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सचिन वाझे गंभीर गुन्ह्यात आरोपी आहे. ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्येचा कट रचणे आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बॉम्बस्फोटके ठेवण्याचा आरोप सचिन वाझेवर आहे.
जर वाझेला नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली तर तो फरार होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तो संरक्षित साक्षीदार जे त्याचे सहकारी होते, त्यांना प्रभावित करण्याची शक्यता आहे. आरोपी त्यांना लगेच ओळखू शकतो. साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता.
काही दिवसांपूर्वी वाझे याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात योग्य त्या वैद्यकीय सुविधा तसेच स्वच्छता नसल्याने तीन महिने आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी वाझे याने याचिकेद्वारे केली आहे.
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना ज्याप्रमाणे प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला, त्याचप्रमाणे आपल्यालाही जामीन मिळावा, अशी मागणी वाझे याने याचिकेत केली आहे. वरवरा राव आणि वाझे ही दोन वेगळी प्रकरणे आहेत. राव यांना जामीन मंजूर करण्यात आला, तर वाझे न्यायालयीन कोठडी नजरकैदेच्या स्वरूपात मागत आहे, असे एनआएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मंगळवारच्या सुनावणीत न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने वाझे याचे वकील रौनक नाईक यांना बायपास सर्जरीनंतर वाझच्या प्रकृतीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तर कारागृह प्रशासनाला वाझेच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात ठेवली आहे.