लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अँटिलिया स्फोटके जप्ती व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी माजी मुंबईपोलिस अधिकारी सुनील माने याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी त्याने विशेष एनआयए न्यायालयाला अर्ज पाठविला आहे.
सध्या तळोजा कारागृहात असलेल्या माने व सहआरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी मानेने त्याचा अर्ज न्यायालयाला वाचून दाखविला. मानेने त्याच्या अर्जात नमूद केले आहे की, २६ वर्षांच्या कारकिर्दीत माझे मूल्यांकन ‘उत्कृष्ट’, ‘अति चांगले’ असे करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य सरकार असे मिळून २८० पुरस्कार प्राप्त झाले. कारावासाच्या काळात खोलवर विचार केल्यावर मला माझ्या चुका लक्षात आल्या. एक पोलिस अधिकारी असल्याने देशातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होते, परंतु दुर्दैवाने आणि नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या. त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी आणि पीडित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी मी या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती, तथ्ये आणि सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आहे, असे माने याने अर्जात म्हटले आहे. माने याने सीसीआरपीसी कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाची माफी मागितली. विशेष न्यायालयाचे न्या.ए.एम. पाटील यांनी माने यांच्या अर्जावर एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे व अन्य आरोपींनी मानेच्या अर्जावर आक्षेप घेत, अर्जाला विरोध करण्याची परवानगी मागितली.