रायगड : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अर्णब गोस्वामींना आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या चिठ्ठीत नावे असलेले फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक केली. यानंतर या तिघांनाही रायगडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सकृत दर्शनी पुरावा आढळला नाही. त्यामुळे सरकार पक्षाची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात आज अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.
दरम्यान, २०१८ मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वय नाईक यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले. मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारने या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक केली. अन्वय नाईक यांच्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांनी 83 लाख, फिरेज शेख यांनी 4 कोटी, नितेश सारडा यांनी 55 लाख रुपये थकविल्याचे म्हटले होते. ही चिठ्ठी अन्वय नाईक यांच्या मुलीने आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली.