मडगाव - कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याला तडीपार करण्यासंबधी गोवा प्रशासनने पाउले उचलली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या दंडाधिकारी कार्यालयात तडीपार संबधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रकरणाची सुनावणी २७ डिसेंबरला होणार आहे. ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई हे सरकारपक्षाच्यावतीने बाजू मांडीत आहेत. अन्वर हा सध्या गोव्यातील कोलवाळ तुरुगांत आहे.
अन्वर याच्याविरोधात गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्यात २५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. अन्वरची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्या सततच्या गुन्हेगारी कृत्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या तडीपारचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवला आहे. एका महिलेचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मागच्या महिन्यात गोवा पोलिसांनी अन्वरला कर्नाटकातील सौंदत्ती येथे जेरबंद केले होते. संशयिताने पिडीत महिलेला धारवाड येथे नेउन एका खोलीत कोंडून ठेवले होते. अन्वरचे अन्य साथिदार तुळशीदास राजू नाईक , शिवदत्त तलवार व राघवेंद्र देवर या तिघाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संशयितांनाही पोलिसांनी अटक केली होती.गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील कुडचडे पोलीस ठाण्यात अन्वर व तुळशीदास नाईक याच्यावर पंटेमळ - कुडचडे येथील गोरन फर्नांडीस याच्यावर कोयत्याने हल्ला करुन जखमी केल्याचा आरोप आहे. तुळशीदास याच्याविरोधात पण तडीपारचा प्रस्ताव कुडचडे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर ठेवला आहे. त्याच्याविरोधातही पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत.