नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत (एपीएमसी) खरेदीकरीत आलेल्या एका किरकोळ व्यापाऱ्याकडे काल सकाळी दोन हजारांचा पाच बनावट सापडल्या आहेत. आलम रहीम शेख (वय - ३२) असे या अटक आरोपीचे नाव आहे. तो अँटॉप हिल येथील रहिवाशी आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत पाच घाऊक बाजारपेठ येतात. यातील भाजीपाला बाजारातील मिरचीचे घाऊक व्यापारी महमद हारिस राऊदर यांच्याकडे मिरची घेण्यासाठी काल सकाळी आलम शेख आला होता. मिरची घेतल्यानंतर त्यांनी दोन हजारांची नोट राऊदर यांना दिली. मात्र, नोट हातात घेतल्यावर राऊदरांना ती वेगळी वाटली. बारकाईने पाहणी केल्यानंतर त्यांना नोट बनावट असल्याची खात्री झाली. त्यांनी याबाबत एपीएमसी पोलिसांना कळविले. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि व्यापाऱ्याची तपासणी केली असता आणखी चार बनावट नोटा त्याच्याकडे सापडल्या. आपण भिशीत पैसे भरले होते असून त्यामार्फत या नोटा मिळाल्या असल्याचे त्याने सांगितले. या नोटा नेमक्या कोठून आल्या याचा एपीएमसी पोलीस तपास करत आहेत. अँटॉप हिल येथे चौकशीसाठी दोन पोलिसांना पाठवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.