पुणे : वाळू तस्कर अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णु यशवंत जाधव याला जामीन मिळाल्याने त्याच्या समर्थकांनी येरवडा कारागृहाबाहेर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे येरवडापोलिसांनी त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना त्याचे उल्लंघन करुन कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत झाल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाला सिद्धु ठुसे (वय ३९), गणेश दत्तात्रय चौंधे (वय ३८), गणेश पांडुरुंग काळे (वय ३०), सोपान नवनाथ मडके (वय २८), शिरीष अनिल कारले (वय २६), संदीप बापूर जगदाळे, दादा बबन गव्हाणे (वय २८), योगेश लक्ष्मण गव्हाणे (वय २८), नितिन भिकोबा सोडनवर (वय ३८), संतोष हरिभाऊ गव्हाणे (वय २८), अंकुश विठ्ठल मल्लाव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस दिली आहे.कारागृहात कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून शासनाने येथील कैद्यांना तात्पुरता जामीन देण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय कारणावरुन विष्णु जाधव याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याला सोमवारी येरवडा कारागृहातून सोडण्यात येणार होते. ही माहिती समजल्यावर उरळी कांचन, लोणी काळभोर येथून त्याचे समर्थक सोमवारी रात्री ९ वाजता येरवडा कारागृहाबाहेर जमले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे पोहचले. त्यांना तेथून हकलून लावले. मनाई आदेशाचा भंग करुन कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी शासनाने फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या उपाय योजनाचे पालन न करता हयगयीने व मानवी जिवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करुन कोरोना संसर्ग पसरविण्याची कृती केली म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच महा कोविड १९ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.हातभट्टीवाला, वाळू माफिया, लँड माफिया आणि जबरदस्त राजकीय वरदहस्त असलेल्या अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५५, रा. उरळी कांचन) याचा जून २०१५ मध्ये निर्घृण खुन करण्यात आला होता. या खुन प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी विष्णु जाधव याच्यासह सुरुवातीला ७ जणांना अटक केली होती.तेव्हापासून विष्णु जाधव हा कारागृहात होता. अप्पा लोंढेचा भाऊ विलास लोंढे याच्या खुनामध्येही विष्णु जाधव हा आरोपी होता.सत्र न्यायालयानेशिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयातून जामीन मिळवून विष्णु जाधव व इतर बाहेर आले होते.त्यांचा जामीन रद्द करुन खटला लवकर सुरु व्हावा, यासाठी अप्पा लोंढेचा प्रयत्न होता़ त्यातूनच अप्पा लोंढेचा काटा काढला गेला होता.
अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णु जाधवला जामीन, कारागृहाबाहेर समर्थकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 3:19 PM
वैद्यकीय कारणावरुन विष्णु जाधव याला न्यायालयाने केला जामीन मंजूर
ठळक मुद्देबेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे येरवडा पोलिसांनी केला समर्थकांवर गुन्हा दाखल