लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केलेल्या प्रकरणाशी संबंधित बातम्या आल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत महिलेच्या वडिलांनी चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत मंगळवारी मध्यस्थी अर्ज दाखल केला.
जनहित याचिका दाखल केल्याबद्दल कोणत्याही राजकीय व्यक्तीला आपला विरोध नाही. परंतु, कोणतेही आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी, असे महिलेच्या वडिलांनी अर्जात म्हटले आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या संजय राठोड यांच्यावर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका निकाली काढण्यास हरकत नसल्याचे ७ ऑगस्ट रोजी चित्रा वाघ यांच्या वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने सुनावले. महिलेच्या वडिलांच्या वकिलांनी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे मध्यस्थी अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती केली. 'माझी कोणाच्याही विरोधात तक्रार नाही. राजकीय हेतूने प्रेरित असलेले काही लोक आरोप करत आहेत. माझ्या मुलींसंबंधी बातम्या येतात, तेव्हा त्यांना सासरी त्रास होतो,' असे अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने अर्जावर २ सप्टेंबर रोजी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले.
फेब्रुवारी २०२१मध्ये संबंधित महिलेने राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येशी संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आले. राठोड महाविकास आघाडीत असताना वाघ यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.