नागपूर : तपास यंत्रणांसाठी आव्हान ठरलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात शहर पोलिसांनी अखेर यश मिळवले. नागपुरातील गँगस्टर रंजित सफेलकर याने ५ कोटी रुपयांची सुपारी घेऊन कुख्यात नब्बूच्या भाडोत्री गुंडांकडून निमगडेंची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांनी ही माहिती दिली.
उल्लेखनीय म्हणजे, लोकमतने सोमवारी १५ मार्चच्या अंकात ‘आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा’ करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होेते. पत्रकार परिषदेदरम्यान लोकमतच्या या वृत्ताचीही जोरदार चर्चा झाली. वर्धा मार्गावरील सुमारे दोनशे कोटींच्या जमिनीचा साैदा १९८२ ला इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पज सोसायटीसोबत निमगडे यांनी ३३ लाखात केला होता. पैशाचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे जमिनीचा वाद वाढला. नंतर ५० कोटींच्या या जमिनीची किंमत दोनशे ते अडीचशे कोटीत गेल्याने हा वाद सुटण्याऐवजी चिघळतच गेला. या पार्श्वभूमीवर, ६ सप्टेंबर २०१६ ला एकनाथ निमगडे गांधीबाग गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेले. सकाळी ७ च्या सुमारास ते त्यांच्या मोपेडने घराकडे येत असताना अचानक काळ्या रंगाच्या मोपेडवर तोंडाला स्कार्फ बांधलेल्या तरुणाने त्यांना लाल इमली मार्गावर अडविले आणि देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार करून निमगडे यांची हत्या केली. या हत्याकांडाने नागपूरच नव्हे तर त्यावेळी राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शहरातील संतोष आंबेकर, दिवाकर कोतुलवारसह बहुतांश बड्या गुन्हेगारांची कसून चौकशी केली होती. मात्र, पोलिसांना मारेकरी शोधण्यात यश आले नसल्याने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तीन वर्षे तपास करूनही सीबीआयला प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले नव्हते. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी अनडिटेक्ट मर्डर चा छडा लावण्यासाठी शहरातील १० हजारांपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेणे सुरू केले. त्यातून निमगडे हत्याकांडाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. तपास सीबीआयकडे असल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने या गुन्ह्यातील एकेका गुन्हेगाराला वेगवेगळ्या पद्धतीने बोलते केले अन् हत्याकांडाच्या कड्या जुळविल्या. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार, कामठी, नागपूरचा गँगस्टर रणजीत सफेलकर याने निमगडेंची हत्या करण्यासाठी पाच कोटींची सुपारी घेतल्याची माहिती पुढे आली. कुख्यात सफेलकरचा राईट हॅण्ड कालू उर्फ शरद हाटे याने जुलै २०१६ मध्ये उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड नब्बू उर्फ नवाब छोटे साहाब याला ही सुपारी दिली.