नवी दिल्ली : लोकांना लुबाडण्यासाठी सायबर चोरटे विविध प्रकारांचा अवलंब करीत आहेत. फसवणुकीसाठी नोकरी, बक्षिसे तसेच फॉरेन टूरचे आमिष दाखवले जाते. अश्लील व्हिडीओ पाठवून लोकांना वेठीस धरून मोठी रक्कम उकळली जात असते. पेमेंटसाठी बोगस लिंक पाठवल्या जात असतात. आता डिजिटल हाउस अरेस्ट हा प्रकार उजेडात आला आहे. यात फसलेल्या नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. हा धोका वेळीच ओळखून लोकांना सावध राहण्याची गरज आहे.
चोरट्यांच्या जाळ्यात लोक कसे अडकतात?
फसवणुकीच्या या प्रकारात चोरटे बहुतांश वेळा पोलिस अधिकारी, सीबीआय किंवा कस्टम अधिकारी असल्याचा बनाव रचतात. तशा प्रकारचा पेहराव करतात. व्हिडीओ कॉल करताना संबंधित कार्यालय मागे दिसेल अशी व्यवस्था करतात. हेरलेल्या सावजाला फोन केला जातो. खूप मोठ्या आर्थिक व्यवहारात तुमचा पत्ता किंवा आधार कार्ड याचा वापर झाला आहे, असे सांगून तुम्हाला घाबरवले जाते. तुम्ही पाठवलेले पार्सल पकडले गेले आहे. त्यात बेहिशेबी सोने, ड्रग्ज, बंदी घातलेली औषधे आढळली आहेत. त्यामुळे तुमची चौकशी केली जाऊ शकते, अटकही होऊ शकते असे सांगितले जाते. महिलांना अश्लील क्लिप असल्याचे सांगितले जाते. ही व्हायरल झाल्यास मोठी बदनामी होण्याची भीती दाखवली जाते. यातून सुटका करून घेण्यासाठी लोक चोरटे सांगतील त्या ठिकाणी जायला तयार होतात. तिथे गेल्यानंतर लोकांना एकप्रकारे धमकावून अटकेत ठेवले जाते. त्यांच्याकडून हवी तितकी रक्कम उकळली जाते. बँक खात्याचा तपशील आदी बाबी काढून लाखो रुपये उकळले जातात.
अरेस्ट कशी टाळावी? nकॉल आल्यास अजिबात न घाबरता याची माहिती सायबर पोलिसांना द्यावी. जवळच्या पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवावी. nसरकारने सुरु केलेल्या ‘चक्षु पोर्टल’वर झालेल्या प्रकाराची माहिती लगेच कळवावी. nकुणालाही बँक खाते, पॅन तसेच आधार क्रमांक, कार्ड पिन, ओटीपी या बाबी देऊ नयेत.