मुंबई - पबजी, तीन पत्ती यांसारख्या आॅनलाईन गेमची सध्या सगळीकडे क्रेझ पहावयास मिळते आहे. मात्र अशा गेमच्या नादात पॉर्इंट कमविण्यासाठी तुम्ही तुमची माहिती शेअर करत असाल, तर जरा जपून. कारण अशा गेमवेड्यांकडून गुगल-फेसबुकच्या माध्यमातून डेबीट/क्रेडीट कार्डची माहिती घेत अहमदाबादच्या दुकलीने आंतराष्ट्रीय गेमसह पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी केले आणि ते पॉर्इंट पुन्हा गेमवेड्यांना विकून ते लाखो रुपये मिळविल्याचे उघड झाले आहे.मुलुंडमधील तक्रारदार वकील महिलेच्या खात्यातील पैशांतून आंतराष्ट्रीय मुंंगफ्राँग लब, आॅक्ट्रो इंक, तसेच पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी करण्यात आले. जवळपास २० ते २५ वेळा त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले. तक्रारदारांनी याप्रकरणी थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलिसांच्या तपासात ते पॉर्इंट अहमदाबादच्या एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी अहमदाबादच्या महादेव नगर परिसरात धाव घेतली. तेथून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आरोपीचे नाव समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी हितेश पटेल या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह नटूभाई ठाकूर (३९) यालाही अटक केली.
मुंबईसह राज्यभरातील तरुणांची फसवणूकहितेश पटेल आणि नटूभाई ठाकूर यांच्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी आतापर्यंत मुंबईसह राज्यभरातील विविध लोकांची अशाचप्रकारे फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? हे काम कधीपासून सुरू होते? त्यांनी आतापर्यंत किती जणांना फसविले आहे? याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली.