लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, आग्रा शहरात झालेल्या लग्नात शुल्लक कारणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि यातच एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादाचे कारण होते रसगुल्ले. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रसगुल्ल्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान, काही लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या, चाकू आणि चमच्याने हल्ला केला. यावेळी 10 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मारहाणीनंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. या घटनेनंतर लग्नस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
आग्रा येथील खंडौली येथील व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचे लग्न एतमादपूरमध्ये ठरले होते. या दोन्ही मुलांचे लग्न उस्मानच्या मुली झैनाब आणि साजियासोबत ठरले होते. मुलांची वरात आली, त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. लग्नात खान्यापिण्याचे अनेक स्टॉलही लावण्यात आले. यावेळी एका व्यक्तीला जास्तीचा रसगुल्ला न दिल्यामुळे वाद पेटला.
यावेळी तरुणांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी महिला व ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकायला तयार नव्हते. लग्नाच्या मांडवाचे रुपांतर भांडणाच्या मैदानात झाले. या भांडणात जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच, यात अनेक लोकही जखमी झाले. या वादानंतर मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.