मुंबई - दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी लावलेले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो, अमित ठाकरे यांचं नाव होतं. दरवर्षीप्रमाणे मनसेने हे कंदील लावले होते आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई करत सर्व कंदिल काढले आणि त्यांना केराची टोपली दाखवली. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क सीफेस परिसरात पाहणीसाठी गेलेल्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हुज्जत घालत जाब विचारला. याबाबत शिवाजी पार्क पोलिसांनीसंदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे.
मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचे देशपांडे म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिघावकर यांना दिला. मनसेच्या कंदिलांवरून महापालिकेच्या कारवाईनंतर दादर-माहिम मधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे.या घटनेनंतर संदीप देशपांडे यांच्याविरोधात दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं आहे.