लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: पती-पत्नीमध्ये विकोपाचे भांडण झाल्यानंतर अनेकदा जोडीदारांपैकी एक जण टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. नेरळ येथील घटनेत पत्नी बरोबर झालेल्या भांडणामुळे पतीने आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा विचार केला होता. पतीच्या या विचाराची कल्पना येताच पत्नीने त्वरित पोलिसांच्या आपातकालीन ११२ या हेल्प लाईन नंबरवर फोन करून पोलिसांच्या मदतीने पतीचे प्राण वाचविले. त्यामुळे संकटकाळात ११२ हेल्प लाईन सुविधा नागरिकांना फायदेशीर ठरत आहे.
नेरळ येथील महिला सेल्वी मॅनेजेस (रा. नेरळ) हिचे पती अँन्थन मॅनेजेस याच्यासोबत २० नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास काही कारणास्तव भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर पतीने हातात चाकू घेऊन स्वतःच्याच गळ्याला लावला. तो बाथरूम मध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. पतीच्या या अनपेक्षित कृतीने पत्नी घाबरून गेली. तिने स्वतःला सावरून त्वरित अलिबाग येथील पोलिसांच्या ११२ या संकटकालीन मदत नियंत्रण कक्षाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने त्वरित नेरळ पोलिसांशी संपर्क करून घटनास्थळी जाण्यास सांगितले.
बाथरूमचा दरवाजा उघडल्यावर...
घटनेच्या तीन मिनिटांतच नेरळ पोलीस नाईक रमेश बोडके व अमोल साळुंखे हे घटनेच्या ठिकाणी हजर झाले. तक्रारदार सेल्वी मॅनेजेस व त्यांचे नातेवाई हे सुध्दा तेथेच हजर होते. पोलीस अंमलदार यांनी अँन्थन मॅनेजेस यांना, ' तुम्ही बाहेर या, आम्ही तुम्हाला शक्य ती सर्व मदत करतो’ असे सांगितले. परंतु, बाथरूममधून अँन्थनचा काहीच प्रतिसाद आला नाही. घरातील उपस्थित लोकांच्या सहमतीने पोलीस अंमलदार यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी अँन्थन हातात चाकू घेऊन उभा होता.
अखेर पोलिसांना आले यश
बोडके आणि साळुंखे यांनी क्षणाचाही विलंब न करता अँन्थन याच्या हातातील चाकू काढून घेतला. या झटापटीत साळुंखे याच्या हाताला जखम झाली. मात्र त्यानंतर पुन्हा अँन्थन याने किचन मधून लोखंडी सुरा घेऊन गळ्याला लावून आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे इतर अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन आणि त्यांनी अँन्थनची समजूत काढून सुरा काढून घेतला. अँन्थन याच्या गळ्याला दुखापत झाल्याने त्याला त्वरित रुग्णालयात जाऊन औषध उपचार करण्यात आले. डायल ११२ प्रणालीवर मदतीसाठी दिलेल्या हाकेला पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याने सेल्वी मॅनेजेस यांनी प्रणालीचे व पोलिसांचे आभार मानले.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वामध्ये व अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित व्यक्तीपर्यंत तात्काळ मदत पोहचविण्याच्या उद्येशाने पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड येथे 'डायल ११२' ही जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे. पिडीत व्यक्तींपर्यंत तात्काळ पोलीस मदत कशी पोहचली जाईल याचा सखोल अभ्यास करून पोलीस व जनता यांचे नात्याला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.