लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) सलग दोन दिवसांतील ११ तासांच्या चौकशीनंतरही अभिनेता अर्जुन रामपालची दक्षिण आफ्रिकन मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्सला अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. तिच्या मोबाइलमधील पूर्वीचे कॉल डिटेल्स आणि संभाषणाबाबतचा डाटा मिळविला जात आहे. त्याच्या पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार पुन्हा चौकशीसाठी तिला बाेलावण्यात येणार असल्याचे एनसीबीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
गॅब्रिएलाचा भाऊ अंजिलियस याचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग, त्याअनुषंगाने तिचा सहभाग आणि तिने संबंधितांशी संभाषण केले का, याची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एनसीबीने पंधरवड्यापूर्वी अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकून लॅपटॉप, मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्याची एकदा तर गॅब्रिएलाची सलग दोन दिवस स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. त्या दोघांनाही अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. मध्यंतरी दिवाळीमुळे तपासाच्या प्रक्रियेत थोडी शिथिलता आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. जप्त केलेल्या मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. माेबाइल डाटामधून महत्त्वपूर्ण हाती येऊ शकते, असा संशय असल्याने त्यादृष्टीने डाटा शाेध सुरू आहे.
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आतापर्यंत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह एकूण ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक जण तस्कर असून काही जामिनावर तर काही न्यायालयीन कोठडीत आहेत.