मुंबई : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर रडारवर आलेल्या कुख्यात बिश्नोई टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा पाकिस्तानातून ड्रोनद्वारे होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे.
वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई टोळीने वापरलेली पिस्तुले आणि कडतुसे देशी बनावटीची असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलने १४ एप्रिलच्या पहाटे शूटर सागर पाल आणि विकीकुमार गुप्ता यांच्याकरवी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.
गुन्हे शाखेने पाल आणि गुप्ता यांच्यासह सोनूकुमार बिश्नोई, अनुज थापन, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंग ऊर्फ हॅरी यांना अटक केली. आरोपी अनुज थापन याने गुन्हे शाखेच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपी पाल आणि गुप्ता यांना दोन पिस्तुले आणि ४० काडतुसे देण्यात आली होती. बिश्नोई टोळीतील काही आरोपींना चंडीगड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून परदेशी बनावटीची शस्त्रे जप्त करण्यात आली होती. त्यांचा पुरवठा पाकिस्तानातून ड्रोनच्या साहाय्याने केला गेल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे.
सलमानवरील हल्ल्यासाठी... पाकिस्तानातील डोगर ही व्यक्ती एके ४७, एम १६, एके ९२ ही शस्त्रे पुरवत होती. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी ‘जिगाना’ या शस्त्राचा वापर केला गेला होता. तशाच प्रकारचे शस्त्र सलमानवरील हल्ल्यासाठी आरोपींना देण्यात येणार होते. हे काम सुखा शूटर करत होता. तो अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता. अत्याधुनिक हत्यारे चालविणारे शार्प शूटर्स मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि गुजरात येथे गोल्डी ब्रारच्या आदेशाने दबा धरून बसले होते.
समुद्रमार्गे श्रीलंकेला पलायनाचा प्लॅन गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, रोहित गोधारा यांच्या आदेशाने आरोपी सलमानवर हल्ला करणार होते. हल्ल्यासाठी १८ वर्षांच्या आतील मुलांना वापरण्याचा या टोळीचा मनसुबा होता. हल्ल्यासाठी गाड्या पुरविण्याची जबाबदारी जॉन या व्यक्तीकडे होती. तर, काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र जमण्यास सांगून तेथून समुद्रमार्गे प्रथम श्रीलंकेत आणि नंतर अन्य देशांत पळून जाण्याची व्यवस्था बिश्नोईने करून ठेवल्याचेही पनवेल पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.