लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/पुणे : लष्करी जवानांच्या भरतीसाठी देशव्यापी पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने रविवारी ही परीक्षाच रद्द करण्यात आली. लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने त्याचा पर्दाफाश केला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली. त्याने सध्या सुरू असलेल्या सोल्जर जीडी भरतीचे प्रमुख अख्तर खान व महेंद्र सोनावणे हे आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना सैन्यात काही मुलांना भरती करायचे आहे. ३ लाख रुपये दिल्यावर तुझे काम होईल, असे त्याला सांगितले. त्याने २ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी १ लाख आता व उरलेले काम झाल्यावर द्यावे लागतील. परीक्षेचे प्रश्नसंच तुला देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आझाद याच्याकडे १ लाख रुपये दिले. त्याने काही सराव प्रश्नसंच व्हॉट्स ॲपवर पाठविले. त्यानंतर फिर्यादी शनिवारी पुण्यात आला. त्याने तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी फिर्यादीशी संपर्क साधल्यावर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा आहे. अली अख्तर, महेंद्र सोनावणे, आझाद खान यांनी सर्वसाधारण सैन्य भरतीचे पेपर फोडून ते परीक्षेच्या आदल्या दिवशी उमेदवारांना पुरविणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.लष्करातील भरतीमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत म्हणून आम्ही नेहमी दक्ष असतो. पात्र उमेदवारांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. या परीक्षेत घोटाळे झाल्याने आता ती रद्द करण्यात येत आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.