मीरारोड - मीरारोड येथील कनकिया परिसरातील एका बारमध्ये जास्त बील लावल्याबद्दल विचारणा करणाऱ्या मित्रास बार व्यवस्थापकाने मारले म्हणून सोडवण्यास गेलेल्या सैनिकासह त्याच्या अन्य मित्रास बार कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. मीरारोड पोलीसांनी या प्रकरणात ३० ते ३५ जणांविरोधात गुुन्हा दाखल केला आहे. तसेच बार व्यवस्थापकाने लष्करी सैनिकास मारहाण करत लष्कराबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत मराठी एकिकरण समितीने निषेध करत बारवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
भाईंदरला राहणारे प्रशांत वाघमारे हे सैन्यदलात नोकरी करत असून लग्नासाठी सुट्टीवर आले आहेत. १५ दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाल्याने मित्र संदेश पार्टे राहणार कनकिया, मीरारोड व आनंद काळे यांनी वाघमारे यांच्याकडे लग्नाची पार्टी मागीतली होती. मीरारोडच्या कनकिया भागातील लक्ष्मी पार्क येथे असलेल्या पार्क व्ह्यु हॉटेलमध्ये सोमवारी रात्री पार्टी करण्यासाठी तिघेजण गेले होते. बार कर्मचाऱ्याची परवानगी घेऊन त्यांनी बाहेरुन आणेलेले मद्य प्यायले. जेवण उरकुन बील मागितले असता ११०० रुपयांसह अतिरक्त ३०० रुपये त्यात लावलेले होते. काळेने ३०० रुपये जास्त कसले लावले म्हणून विचारणा केली असता व्यवस्थापकाने कानशीलात लगावली. ते पाहून वाघमारे यांनी मारले का ? असा जाब विचारला. आपण सैन्यदलात असून नियमानुसार पैसे घ्या. वाटल्यास जास्त घ्या पण भांडण नको असे म्हटले असता व्यवस्थापकाने सैनिकास लष्करावरुन शिवीगाळ करत मारायला सुरवात केली. रखवालदाराने बारचे दार बंद केले. कर्मचाऱ्यांनी तीनही मित्रांना जबर मारहाण सुरु केली. बियरच्या बाटल्या डोक्या मारल्या.
संदेशचा भाऊ घटनास्थळी आला व काही वेळात पोलीस आल्याने तिघांची सुटका केली. वाघमारेस पालिकेच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी ३० ते ३५ बार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून बारमधील सीसीटीव्ही फुटेज आदींचा शोध सुरु आहे. त्यानंतर आरोपींना अटक करण्याची कार्यवाही पोलीस करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, सैनिकास केलेली मारहाण व लष्कराबद्दल अपशब्द काढणाऱ्या बारच्या कर्मचाऱ्यांना अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. समितीचे गोवर्धन देशमुख, कृष्णा जाधव, प्रविण पार्टे आदींनी घटनेचा निषेध करत आरोपी बारवाल्यांना अटक करा व बारचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करा अशी मागणी केली आहे.