Army Soldier Killed: बिहारची राजधानी पाटणा येथे लष्कराच्या एका जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जवान सुटीसाठी पाटण्याला पोहोचला होता. त्यावेळी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. बबलू कुमार असे या जवानाचे नाव आहे. कंकरबाग पोलीस ठाण्याच्या चिडियांतर पुलाजवळ डोक्यात गोळी झाडून जवानाची हत्या करण्यात आली. जवान बबलू यांचे वडील अमरनाथ यादव यांनी सांगितले की बबलू गुवाहाटी येथे सेवेत तैनात होते आणि आपल्या मुलाला सेंट्रल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पाटणा येथे आले होते.
हत्या करण्यात आलेले जवान बबलू हे राजधानी एक्स्प्रेस पकडण्यासाठी पाटलीपुत्रहून गुवाहाटीला दुचाकीने जात होते. ते दुचाकीवर मागे बसले होते आणि त्यांचा मित्र बाईक चालवत होता. त्यावेळी मागून एक दुसरी दुचाकी आली. त्यांनी पाटणा स्टेशनचा रस्ता विचारण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केला. त्या बाईकस्वारांनी दुचाकीवर बसलेल्या बबलूच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच बबलू गाडीवरून खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
लष्करी जवान बबलू यांचे पार्थिव दानापूर येथील लष्करी कार्यालयात आणण्यात आले. तेथे लष्करी अधिकारी व जवानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. घडलेल्या घटनेबाबत कंकरबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी करून गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल.
या आधी पाटणा साहिबमध्ये एका विद्यार्थिनीवर सार्वजनिकरित्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शाळेतून परतणाऱ्या नववीच्या मुलीवर गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला होता. आता जवानावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ही सामान्य गुन्हेगारी घटना नाही, गुन्हेगारांच्या मनातून कायद्याचा धाक नाहीसा झाला आहे, असे ते म्हणाले. नितीश जी, हे तुमच्या राज्यात काय चाललंय? बिहार जंगलराजकडे परतत असल्याचं यावरून दिसून येतंय, अशी टीकाही त्यांनी केली