मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तो रायगडमधील न्य़ायालयाने फेटाळला आहे. मात्र, या वेळी अर्णब गोस्वामींनी कारवाईवेळी आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने गुन्हा नोंद झालेल्याची माहिती दिली आहे. रायगड आणि मुंबई पोलिसांचे पथक जेव्हा अर्णबच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यावर कथित हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी रायगड आणि मुंबई पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. यावर पोलिसांच्या कारवाईवेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पोलीस मारहाण करताना दिसत नव्हते. मात्र, यावर गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलने नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये अर्णब गोस्वामी हे उजव्या हातावर उमटलेला व्रण दाखवत आहेत. तसेच त्यांनी पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सचिन वझे व अन्य सात पोलिसांनी घेरून मानेला धरत घराबाहेर नेले. पायात शुजही घालू दिले नाहीत, असा आरोप केला आहे. गोस्वामी यांना आज सकाळी ७ च्या सुमारास रायगड पोलिसांनी अटक केली.
2018 मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचं उघड झालं, मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारनं या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज अर्णब गोस्वामींना पकडून कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
माहितीनुसार, वरळी येथील अर्णब गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितले. तेव्हा अर्णब यांचा मुलगा मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अर्णब यांनी माझ्या मुलाला हात लावू नका असं पोलिसांना बजावलं.