मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी ७ च्या सुमारास रायगड पोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वेय यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता, याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचं उघड झालं, मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारनं या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज अर्णब गोस्वामींना पकडून कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
माहितीनुसार, वरळी येथील अर्णब गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असं पोलिसांनी सांगितले. तेव्हा अर्णब यांचा मुलगा मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अर्णब यांनी माझ्या मुलाला हात लावू नका असं पोलिसांना बजावलं.
जवळपास १५ मिनिटं पोलीस आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाचाबाची झाली. पोलिसांनी अर्णब गोस्वामींना हाताला पकडून खेचून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याने अर्णब यांच्या पत्नीकडून कायदेशीर कागदपत्रावर सही घेण्याचा प्रयत्न केला, पोलीस कारवाईला अर्णब गोस्वामी कुटुंबाने विरोध केल्याचं या व्हिडीओत दिसून आलं.
याबाबत अर्णब गोस्वामींनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तसेच माझ्या मुलाला मारलं, मला औषधे घेण्यापासून रोखलं गेले, तसेच कोणत्याही परवानगीशिवाय पोलिसांनी जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला. पोलिसांनी माझा आणि कुटुंबाचा छळ केला असा आरोप केला, अर्णब यांनी कारवाईला सहकार्य करावं अशी विनंती पोलिसांनी केली, परंतु न ऐकल्याने अखेर पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना खेचत घराबाहेर आणलं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं.
पाहा संपूर्ण व्हिडीओ
भाजपा नेत्यांनी केला अर्णबच्या अटकेचा निषेध
आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
तर आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
“आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”
काय आहे प्रकरण?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.