आविष्कार देसाई
रायगड : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पाेलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी मुंबईतून अटक केली. मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. अलिबागच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. त्याआधी अलिबाग पाेलिस ठाण्यात गाेस्वामी यांना हजर करण्यात येईल त्यानंतर त्याची जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य तपासणी झाल्यावर अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील एँड. भूषण साळवी यांनी लाकेमतशी बाेलताना दिली.
अन्वेय नाईक (५३) यांनी शनिवारी, ५ मे रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (८४) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वेय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वेय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वेय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु केलेल्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत हाेती. अन्वेय यांनी आपल्या सुसाईड नाेटमध्ये हा खुलासा केला हाेता. पाेलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला वेग आला हाेता मात्र हायप्राेफाईल केस असल्याने पाेलिसही जपून पावले टाकत हाेते. त्यानंतर अन्वेय यांच्या मृत्यूच्या तपासाला गती येत नव्हती. या कालावधीत राज्यामध्ये भाजपाचे सरकार हाेते.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी केली अटक
सत्तांतर झाल्यानंतर अन्वेय यांच्या कुटूंबाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागीतली हाेती. त्यानंतर तपासाला पुन्हा वेग आला हाेता.बुधवारी पहाटेच अलिबाग पाेलिसांचे विशेष पथक मुंबई पाेलिसांच्या मदतीने गाेस्वामी यांच्या घरी पाेहचले. त्यावेळी गाेस्वामी यांनी प्रतिकार केला. शेवटी त्यांना पाेलिसांनी अटक केली आणि ते अलिबागच्या दिशेन रवाना झाले आहेत. काही वेळातच गाेस्वामी यांना अलिबागच्या पाेलिस ठाण्यात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जिल्हा सरकारी रुग्णालयात आराेग्य तपासणी करण्यात येणार आहे. नंतर अलिबागच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गाेस्वामी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने रायगड पाेलिसांनी बंदाेबस्तामध्ये वाढ केली आहे. पालघर, रत्नागिरी जिल्ह्यातून पाेलिसांची जादा कुमक मागवल्याची माहिती सुत्रांनी दिली.