रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबागच्या न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. गोस्वामी यांच्यासह अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही तळोजा कारागृहात नेण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले. ज्या वाहनातून गोस्वामी यांना पोलीस घेऊन गेले होते, ती गाडी पूर्णपणे सगळ्या बाजूने झाकण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य दोघांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. ४ दिवस तेथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले.
अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण हाय प्रोफाइल प्रकरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृह प्रशासनाने जिल्हा सत्र न्यायालयाला केली होती. कारागृह महानिरीक्षक यांच्याशी बोलून निर्णय घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.