मुंबई : अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी अलिबाग नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ मध्ये काढावी लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना अलिबाग व इतर जेलमध्ये न नेता त्यांना प्रथम क्वारंटाईन सेंटरप्रमाणे सबजेलमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे अर्णबला क्वारटांईन सेंटर असलेल्या या शाळेमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाकडून अर्णबच्या जामिनाचा अंतरिम दिलासा मिळाला नसल्याने आजही त्यांना या शाळेतच रात्र काढावी लागणार आहे. या शाळेत अन्य गुन्ह्यातील ४२ आरोपी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
एका तुरुंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात १५८ कैदी आणि २८ जेल अधिकाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात २३ शहरांत ३० तात्पुरते जेल्स शाळा, घरे, होस्टेल्स आणि कॉलेजेस स्वरूपात तयार करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आर्थर कारागृहात नवीन कैदाला प्रवेश देण्यात आलेल्या नाही.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेने बुधवार सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. पाेलिसांशी दीड तास हुज्जत घातल्यानंतर गोस्वामी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अलिबागला नेण्यात आले. या वेळी सरकार आणि पोलिसांवर टीका करत वाहनातूनही ‘पूछता है भारत’चा त्यांचा नारा सुरू होता.
सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. सुरुवातीला बराच वेळ पोलिसांना दारातच ताटकळत ठेवण्यात आले. वकिलांशी बोलल्यानंतर गोस्वामी यांनी पथकाला आत येऊ दिले. पुढे पोलिसांनी रीतसर सर्व कागदपत्रे, यापूर्वी दिलेल्या नोटीस त्यांना दाखवून सोबत येण्यास सांगितले. मात्र गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. या वेळी जवळपास दीड तास पाेलिसांशी हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना हात धरून बाहेर नेण्यास सुरुवात करताच, गोस्वामी यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यातही टीव्हीवर लाइव्ह अपडेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना घरातून बाहेर काढत पोलीस वाहनात बसविले. वाहनातूनही सरकार आणि पोलिसांवर त्यांचे टीका करणे सुरू होते. आठच्या एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले.
अर्णब गोस्वामी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हाबुधवारी अटके दरम्यान पोलिसांना धक्काबुकी, शिविगाळ करत सरकारी कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह ५ जणांविरुद्ध एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या अधिनियम प्रतिबंधक भादवि कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रायगड पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात, गोस्वामी यांची पत्नी आणि मुलासह अन्य दोन व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनाक्रम : अटक प्रकरण
- सकाळी ७ वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या वरळी येथील घरी धडकले.- सकाळी ८:१५ वाजता : अर्णब गोस्वामी मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.- सकाळी ११.३० : पोलीस बंदोबस्तामध्ये अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.- दुपारी १२.१४ : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.- दुपारी १ : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप.- सायंकाळी ५ : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर करण्यात आले.