अर्णब यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव, आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी
By पूनम अपराज | Published: November 10, 2020 08:39 PM2020-11-10T20:39:24+5:302020-11-10T20:40:26+5:30
Arnab Goswami : उद्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे.
मुंबई - अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून काल मुंबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले होते. त्यानुसार अर्णब हे अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज काल दाखल केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णबी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णबी यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवला. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले असून, तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. तर उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अर्णब गोस्वामी यांना देण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. गोस्वामी यांची न्यायालयीन कोठडीतच पोलीस चौकशी करता यावी यासाठी रायगड पोलिसांनी तीन तासांची वेळ मागितली होती, ती न्यायालयाने मंजूर केली आहे.