Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटवर पुन्हा एकदा ईडीनं धाड टाकली आहे. बेलघोरिया स्थित फ्लॅटवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासाला सुरुवात केली आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी फ्लॅट आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील माहिती तपासली जात आहे. तसंच अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणब भट्टाचार्यचीही चौकशी केली जात आहे. अर्पिता मुखर्जी सध्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहे.
ईडीनं अर्पिता मुखर्जीच्या दोन फ्लॅटवर टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ५० कोटी रोकड जप्त केली आहे. तसंच मोठ्या प्रमाणात सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अर्पिताच्या कमीत कमी तीन बँक खात्यांच्या व्यवहारावर निर्बंध घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात तपास अधिकाऱ्यांना जवळपास दोन कोटी रुपये बँक खात्यात प्राप्त झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ईडीनं आता अर्पिताशी निगडीत काही बनावट कंपन्यांच्या नावे उघडलेली बँक खाती देखील तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे.