मुंबई - तेलंगणातील आरटीआय कार्यकर्ते पोडेती सत्यनारायण गौड (वय - ५१) यांच्या हत्येतील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेने आज अटक केली. राजेश्वर गौड एलिमती (४६) आणि राजय्या कसारप्पू (वय -५१) अशी या दोघांची नावे आहेत.
तेलंगणाचे राज्यातील हैद्राबाद, करीमनगर, जगीताल, सिरसिल्ला, पेडापल्ली या जिल्ह्यातील अनेकजण मुंबईत ताडीमाडी विक्रीचा व्यवसाय करतात. पोडेती गौड यांनी या ताडीमाडी विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली होती. माहिती अधिकारातंर्गत ताडीमाडीच्या विक्रीची माहीती मागवून त्यांनी यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या. यामुळे मुंबईतील ताडीमाडी विक्रीची बरीचशी दुकाने बंद झाली. यामुळे ताडीमाडी विकणारे संतापले आणि ९ मे रोजी पोडेती यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी धर्मापुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १२ पैकी नऊ आरोपींना अटक केली होती तर तिघे फरार होते.
पोडेती यांच्या हत्येप्रकरणातील दोघे नावे बदलून मुंबईत राहत असल्याची माहीती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने वांद्रे आणि जोगेश्वरी येथून राजेश्वर आणि राजय्या या दोघांना पकडले.