नवीन पनवेल : नवी मुंबई परिसरात विविध गृहप्रकल्पांत स्वस्तात घर आणि बंगला देण्याचे आमिष दाखवून २५ पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक गुन्हे शाखा कक्ष दोन, नवी मुंबई यांच्याकडून अटक करण्यात आली आहे. रोहन रमेश आर्ते (३६) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पनवेल तालुक्यातील नेरे येथे व्हिस्परिंग ट्विन बंगलो स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून अश्विनी आर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर रोहन रमेश आर्ते यांनी नागरिकांकडून २०१५ ते २०१७ या कालावधीत १९ लाख ६३ हजार रुपये घेतले होते. मात्र प्रकल्प पूर्ण न करता आरोपीने बुकिंगधारकांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. याविरोधात २०१९ मध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यात रोहन आर्ते यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील आठ महिन्यांपासून गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी रोहन आर्ते लपून राहत होता. आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नारायण पालमपल्ले यांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहनसर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही घरासाठी बुकिंग करण्यापूर्वी याबाबत शहानिशा व खात्री करून रक्कम गुंतविण्याचे आवाहन पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी केले आहे. योग्या खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नये असे बिपिन कुमार सिंह यांनी सांगितल.