"आवळा मुसक्या, कोण फोन करतो ते बघतो"; अजितदादांनी खास स्टाईलमध्ये सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:16 AM2021-01-09T07:16:21+5:302021-01-09T07:16:52+5:30
Ajit Pawar News: पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे, असे पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला,’ अशा सूचना देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या पोलिसांना सूचना केल्या.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार, शहर पोलीस दलासाठी ‘हेल्थ ३६५’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील तीन हजारांवर पोलिसांना स्मार्ट वाॅचचे वाटप करण्यात आले. चिंचवड येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप झाले, तसेच यावेळी पोलिसांना सायकल व ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले. अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती करताना घाईगडबड झाली. पुरेशी साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोलीस आयुक्तालयासाठी जागा, साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.
चोरांना पाहून पोलीस पळून जातात...
पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते, इतर पोलिसांच्या मनोबलावरही परिणाम होतो. अशा पोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
गुन्हेगारावर वचक हवा
n हातात केवळ काठी असतानाही तुकाराम ओंबळे या पोलिसाने दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले, अशा शहीद ओंबळेंचा वारसा महाराष्ट्र पोलीस दलाला आहे. जागतिक पातळीवर राज्य पोलीस दलाचा लाैकिक आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी.
n पोलिसांचा वचक
सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा. पोलिसांच्या घरांसाठी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात २५० कोटींची निविदा काढून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. लवकरच मेगा भरतीही केली जाईल, असेही पवार म्हणाले.