नवी मुंबई : कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींना कर्जाचे आमिष दाखवून पैसे उकळून फसवणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कार व फसवणुकीचा वापरली जाणारी बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारीच्या आधारे एपीएमसी पोलिसांनी या रॅकेटचा उलगडा केला आहे.रोहित नागवेकर (३०), भालचंद्र पालव (२७) व ओमकार हाटले (३५ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.नवी मुंबई परिसरात त्यांनी आकृती फायनान्सच्या नावाची पत्रके वाटली होती. त्यामध्ये कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला वैयक्तिक कर्ज मिळवून दिले जाईल, याची खात्री दर्शविण्यात आली होती.त्यानुसार, नेरुळच्या योगेश महाजननी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी महाजन यांच्याकडे दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी १८ हजार ७५० रुपयांची मागणी करण्यात आली. तेवढी रक्कम देण्यास महाजन यांनी असमर्थता दाखविल्याने, सभासद शुल्क म्हणून ८ हजार ७५० रुपये भरण्यास सांगितले.महाजन यांनी त्यांना पैसे दिले असता, तिघांनी त्यांना डहाणू येथील विजयदीप सहकारी पतसंस्थेचे कर्ज मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र दिले, परंतु प्रत्यक्षात चौकशी केली असता, ही पतसंस्था अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले. यानुसार, योगेश महाजन यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली.पोलीस निरीक्षक भूषण पवार, वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी पोलीस निरीक्षक भूषण पवार, हवालदार चंद्रकांत कदम, जयपाल गायकवाड, सचिन ठोबंरे, सुनील पवार, संदेश म्हात्रे, अमोल भोसले यांचे पथक तयार केले. तपासादरम्यान सदर टोळीतले काहीजण जुहूगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या सापळा रचून त्यांना अटक केली आहे.योगेश महाजन यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक भूषण पवार यांच्या पथकाला तपासादरम्यान सदर टोळीतले काहीजण जुहूगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार, बुधवारी त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कार, पतसंस्थेची बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीने नवी मुंबईसह इतरही ठिकाणी कर्जाचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.