लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - ४० आठवड्यात पैसे दुप्पट करून देण्याची योजना राबवणाऱ्या इसमास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून कारवाई करत अटक केली आहे . ५८७ गुंतवणूकदारां कडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार इतकी रक्कम आरोपीने गोळा केली आहे .
भाईंदर पूर्वेच्या पंचरत्न इमारतीत रविंद्र शिवाजी जरे रा, इंद्रलोक , भाईंदर पूर्व हा अस्मिता इंटरप्राईजेस नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणूक योजना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . गुंतवणुकीच्या रक्कमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवडयात रक्कम दुप्पट करून दरण्यासह गुंतवणुक योजनेचा प्रसार व प्रचार करून गुंतवणुकदारांना आकर्षीत करणा-या एजंटला १ ते ४ टक्के पर्यंत कमीशन दिले जात होते . किमान १० हजार गुंतवण्याचे बंधन होते .
अशाप्रकारे अव्यवहार्य व अवाजवी परताव्याचे आमिष दाखवुन लोकां कडून पैसे गोळा केले जात होते . विशेष म्हणजे लोक सुद्धा व्यावहारिक व कायदेशीर विचार न करताच पैसे गुंतवत होते . त्यामुळे यातून लोकांची फसवणूक होण्याची खात्री पोलिसांना वाटली .
पोलीस उपायुक्त अमीत काळे व सहायक आयुक्त डॉ. शशीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, उपनिरीक्षक राम कदम व प्रमोद पाटील सह खोत, पाटील, अदक, वाघ, माने, राठोड, उगले, वाकडे, शेलार, चव्हाण यांच्या पथकाने चौकशी सुरु केली . पोलीस अधिकारी हे एका खाजगी व्यक्तींसह गुंतवणूकदार बनून जरे ह्याला जाऊन भेटले . त्यांनी गुंतवणूक योजना व परतावा आणि गोळा होणाऱ्या पैश्यांचा काय विनीयोग करतो ह्या बाबत विचारपूस केली .
त्यावेळी जरे ह्याने गुंतवणुक रक्कम घेण्यासाठी रितसर कंपनीची नोंदणी केली असून गोळा होणारी रक्कम शेअर्स मार्केटमध्ये गुंतवत आहे . व त्यातून प्रती आठवडा ५ टक्के परतावा देत आहे . तर एजंटला २ टक्के कमीशन दिले जात असल्याचे त्याने सांगितले. परंतु जरे हा गुंतवणुक योजना चालवण्या बाबत अधिकार असल्याचा सक्षम प्राधिकरणाचा परवाना दाखवू शकला नाही.
त्यामुळे जरे हा सेबी, आरबीआय किंवा अन्य कोणत्याही नियामक यंत्रणाची मान्यता नसतांना बेकायदेशीरपणे गुंतवणुक योजना अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून राबवत असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. सदरची बोगस ठेव योजना राबविण्यात येत असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मंजुरी नंतर पोलिसांनी दोन पथके बनवून एकाचवेळी जरे याच्या कार्यालय व घरावर २८ जानेवारी रोजी छापा टाकला .
झडती दरम्यान घर व कार्यालयामधून बेकायदेशीर गुंतवणुक योजना राबवत असल्याबाबतची गुंतवणुकदारांची यादी, गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या पावत्या गुंतवणुकदारांना देण्यात येत असलेला परतावा दर्शविणारे माहिती पत्रक, एजंटना दयावयाचे कमिशन याबाबतचे माहितीपत्रक इत्यादी कागदपत्रे व ११ लाख ७१ हजार रोख असा मुद्देमाल पोलिसांना सापडला . जरे ह्याच्यावर फसवणूक व बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली . त्याने जुन २०२१ पासुन सुमारे ५८७ गुंतवणुकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार इतकी रक्कम बोगस ठेव योजनेद्वारे गोळा केली. तसेच एजंटना १ ते ४ टक्क्यापर्यंत कमीशन दिले गेले होते . पोलिसांनी त्याची ७ बँक खाती गोठवली असून त्या खात्यात २४ लाख रुपयांची रक्कम जमा आहे . न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे .