मीरारोड - देव दर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडणाऱ्या आणि गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
भाईंदर पूर्वेच्या रावल नगर, नर्मदा सदन मध्ये राहणारे सिध्देश कांबळी व कुटुंबीय हे १७ डिसेंबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी दार फोडत घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. या बाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने तपास करून कमरुद्दीन सलाउद्दीन शेख व आरीफ हुसैन खान दोन्ही रा. कुर्ला, मुंबई या आरोपींना अटक केली. त्यांच्या कडून चोरलेले ४ लाख ७५ हजारांचे दागिने व १ लाख ५३ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कटावणी आदी जप्त केले आहे.