नारायणगाव : नारायणगाव येथील २८ वर्षीय तरुणाचा दारूच्या नशेत खून करणाऱ्या तीन जणांपैकी एकाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. खुनाचा प्रकार शिरूर तालुक्यातील वाफगावजवळ पाबळ ते वरुडे रोड घाटमाथा जवळ येथे घडला होता. शाब्दिक वादावादीमुळे दारूच्या नशेत खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खून प्रकरणी एकास अटक केली आहे. इतर दोघे फरार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली . अर्जुन तानाजी वाजगे (वय २८, रा. डिंबळे वाजगे मळा नारायणगाव ता. जुन्नर) याचा मंगळवारी (दि. १६) रात्री ८ च्या सुमारास खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी राहुल ऊर्फ बंटी साहेबराव डफळ (वय २८, रा. रूम नं. ३ शेवंता पार्क, तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर, ता. खेड), स्वप्निल ऊर्फ धनंजय गणेश हजारे (रा. कण्हेरसर, ता. खेड), मयूर तानाजी हजारे (रा. कण्हेरसर, ता. खेड) या तिघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फरार राहुल उर्फ बंटी साहेबराव डफळ याचा शोध घेऊन गुन्हे शोध पथकाने गुरुवारी (दि. १८) अटक करून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन वाजगे हे नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर ओझर फाटा रस्ता येथील एका बारमध्ये मद्य प्राशन करीत असताना राहुल डफळ व स्वप्निल ऊर्फ धनंजय हजारे याची ओळख झाली. त्यानंतर हे तिघेही एकत्र दारू प्याले. तेथून ते मंचर येथे एका बारमध्ये गेले. तेथे पुन्हा दारू पिऊन राहुल डफळ याच्या भावाकडे शिक्रापूर येथे गेले. तेथे पुन्हा एका बारमध्ये बसून दारू पीत असताना स्वप्निल हजारे व अर्जुन वाजगे यांची शाब्दिक बाचाबाची झाली. अर्जुनने स्वप्निल याच्या कानाखाली मारली. बारमध्ये वाद सुरु झाल्याने बारचालकाने या तिघांना बारमधून बाहेर काढले. या वेळी स्वप्नीलच्या मनात राग होता. तिघेही दुचाकीवर बसून पाबळच्या दिशेने गेले. त्या वेळी स्वप्निलने त्याचा मित्र मयूर हजारे याला पाबळ रोडकडे बोलावून घेतले. जाताना तिघे एका ठिकाणी थांबले. त्या ठिकाणी मयूर हजारे आला आणि त्याने अर्जुनला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली असता राहुल डफळ व स्वप्निल हजारे यांनीही मारहाण केली. अर्जुन जमिनीवर पडला असता एकाने अर्जुनच्या डोक्यात दगड घातला आणि तिघेही त्याठिकाणहून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद भांबळे, पोलीस नाईक दीपक साबळे, राजू मोमीन या पथकाने लगेच तपासाला सुरुवात केली. अर्जुन वाजगे याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पथकाला नारायणगाव, मंचर याठिकाणी तपास सुरु असताना खबºयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने रात्रभर विविध ठिकाणचे सीसीटीव्हीचे चित्रण तपासले. बुधवारी (दि. १७) मध्यरात्री २च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार चाकण येथून राहुलला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता राहुल डफळ याच्याबरोबर स्वप्निल उर्फ धनंजय गणेश हजारे व मयूर तानाजी हजारे हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे दोघेही सध्या फरार असून पोलीस व गुन्हे शोध पथक त्यांच्या मागावर आहेत.
नारायणगाव येथे दारुच्या नशेत खून करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:18 PM
शाब्दिक वादावादीमुळे दारूच्या नशेत खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ठळक मुद्देदोन आरोपी फरार : शिरूर तालुक्यात घडली होती घटना, गुन्हे शोध पथकाची कामगिरी गुन्हे शोध पथकाची कामगिरी